सर्वसामान्य लोक आपल्या मेहनतीची कमाई सुरक्षित राहावी म्हणून बँकेत ठेवत असतात. मात्र गरजेवेळी हे पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यावर तुमच्या खात्यात पैसेच नाहीत, असं उत्तर मिळाल्यावर अशा गरीब गरजूंना बसणाऱ्या धक्क्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. काहीशी अशीच घटना बिहारमधील सीतामढी येथे घडली आहे.
उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या बैरगनिया शाखेमध्ये जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची बँक खाती रिकामी असल्याचं कळालं. याबाबत समजल्यावर इतर लोकही आपला बॅलन्स तपासण्यासाठी बँकेत धाव घेऊ लागले. मात्र सगळ्यांनाच तुमच्या खात्यात पैसे नाही आहेत, असं उत्तर मिळालं. हे उत्तर ऐकून सर्वसामान्य ठेवीदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.
ही बातमी आजूबाजूच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. बँकेत लोकांची गर्दी झाली. तणाव, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एका खातेधारकाने सांगितलं की, त्याच्या घरात लग्न आहे. त्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून पैसे काढण्यासाठी बँकेत ये जा करत आहे. मात्र दररोज कॅशियरकडून सबबी दिल्या जात आहेत. कधी मशीन खराब असल्याचं सांगितलं जातंय, कधी लिंक फेल असल्याचं सांगतात. मात्र जेव्हा मी पासबूक अपडेट करण्यासाठी गेलो तेव्हा खात्यामध्ये ९ लाख रुपयांऐवजी केवळ ४३ हजार रुपयेच असल्याचे समोर आले.
आणखी एका खातेदाराने सांगितले की, त्याच्या खात्यामधून १५ लाख रुपये गायब आहेत. असेच अनेक खातेदार आहेत, ज्यांच्या खात्यांमधून त्यांच्या परवानशीविना पैसे काढण्यात आले आहेत. आता हे सर्व कॅशियर आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून केल्याचा आरोप खातेदार करत आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार या शाखेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ५ कोटी रुपये गायब झाले आहेत. जेव्हा तणाव वाढला तेव्हा विभागीय व्यवस्थापक प्रभात कुमार बैरगनिया यांनी शाखेमध्ये धाव घेतली आणि लोकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यांनी तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सध्या बँकेत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.