नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा अखेरचा टप्पा जम्मू काश्मीरात सुरू आहे. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी नेहमी चर्चेत आहेत. आता राहुल गांधी यांनी लग्न कधी करणार? कुणासोबत करणार? इतकेच नाही तर जेवणात त्यांना काय काय आवडतं यावर राहुल गांधींनी खुलासा केला आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Curlytales सोबत संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधींना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राहुल गांधींनी दिलखुलास उत्तर दिले. तुम्ही लग्नाचं प्लॅनिंग करताय का? असं राहुल यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, जेव्हा योग्य मुलगी भेटेल तेव्हा लग्न करेन. तुम्ही कुठल्या मुलीशी लग्न करणार असं विचारले तेव्हा ती प्रेमळ आणि अभ्यासू असायला हवी असं त्यांनी सांगितले.
राहुल गांधींनी या मुलाखतीत राजकीय मुद्द्यांवर भाष्य न करता खासगी विषयांवर बोलले. राहुल गांधींनी सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचा उल्लेख करत म्हटलं मी लग्नाविरोधात नाही. माझ्या आई वडिलांचं लग्न खूप छान होते. ते दोघे एकमेकांना खूप प्रेम करायचे. त्यामुळे लग्नाचे विचार मोठे आहेत. मी अशाच एका लाईफ पार्टनरच्या शोधात आहे असं त्यांनी सांगितले.
जेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की तुम्हाला काय खायला आवडते? त्यावर ते म्हणाले की मी सर्व काही खातो. पण फणस आणि वाटाणे आवडत नाहीत. मी जेव्हा घरी असतो तेव्हा खाण्यापिण्याच्या बाबतीत मी खूप कठोर असतो. पण प्रवासादरम्यान पर्याय नसतो. त्यामुळे जे मिळेल ते खातो. तेलंगणातील लोक मिरची जास्त खातात, त्यामुळे तिथे अडचण झाली असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत राहुल गांधी म्हणाले, माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला, जे उत्तर प्रदेशात आले होते, आजोबा पारशी होते. सामान्य अन्न घरी शिजवले जाते. दुपारच्या जेवणासाठी देशी खाद्यपदार्थ आणि रात्री कॉन्टिनेंटल फूड तयार केले जाते. मला आईस्क्रीम आवडते. एवढेच नाही तर राहुल यांना तंदूरी खायला आवडते. चिकन टिक्का, मटण, सीख कबाब आणि ऑम्लेट आवडतात. पूर्वी ते जुन्या दिल्लीला जायचे. आता कधीतरी मोती महालात जातो. कधी कधी सागर, स्वागत, सर्वना भवनही खाण्यासाठी जातो असं राहुल गांधींनी म्हटलं. शिक्षण किती, पहिली नोकरी कुठे केली?राहुल गांधींनी सांगितले की, त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आहे. यानंतर हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणाचा अभ्यास केला. यानंतर वडिलांचे निधन झाले. पुढे अमेरिकेला गेले. रोलिन्स कॉलेजमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स, इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. केंब्रिज विद्यापीठातून मास्टर्स केल्यानंतर पहिले काम लंडनमध्ये केले होते. कंपनीचे नाव 'मॉनिटर' होते, जी एक स्ट्रेटेजिक कंसल्टिंग कंपनी होती. त्यावेळी मला ३००० ते २५०० पौंड पगार मिळत होता. त्यावेळी हा पगार पुरेसा होता. मी तेव्हा 25 वर्षांचा होतो.