नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणात प्रचार टिपेला पोहोचला आहे. निवडणुका म्हटल्या की, मतदारांना प्रलोभने, पैशांचे आमिष आणि मद्याचे वाटप हाेते. यंदाही निवडणूक असलेल्या राज्यात धाडसत्र सुरू झाले आहे. कोट्यवधी रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे; पण यानिमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो की, या पैशांचे नंतर नेमके होते काय?
राजस्थानात दोन आठवड्यांत २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तेलंगणात ३०० कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेला पैसा आयकर विभागाकडे दिला जाताे. वैध असेल आणि संबंधित पुरावे सादर केल्यास, तर तो पैसा परत करण्यात येतो.
मद्याच्या बाटल्यांवर चालतो बुलडोझर
निवडणुकीच्या काळात नेहमीच देशी आणि विदेशी मद्याचा साठा ठिकठिकाणी पकडला जातो. जप्तीनंतर या मद्याच्या साठ्याचे काय होते, असा सवालही अनेकांच्या मनात उपस्थित होतो. यावर बोलताना उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या मद्याच्या बाटल्यांवर बुलडोझर चालवून त्या नष्ट केल्या जातात.