मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस सरकारच्या कर्जमाफीवरून आरोप केलेले असताना त्यांच्या घरासमोर काँग्रेसने पुराव्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे टाकले होते. मात्र, कर्जमाफीवरून आता काँगेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधियांना एका शेतकऱ्याने खरीखोटी सुनावली आहे. यामुळे सिंधियांच्या दाव्यांची पोलखेल झाली आहे.
मध्यप्रदेशमध्ये नव्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. राज्य सरकार स्थापन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच 2 लाखांचे कर्ज माफ केल्याची घोषणा करण्यात आली होती. याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या गुना शिवपुरी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया प्रचारसभा घेत होते. यावेळी त्यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच नसल्याचे सांगितले.
गुना शिवपुरीच्या करोदमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांची सभा सुरु होती. जेव्हा सिंधिया यांनी कर्जमाफीबाबत बोलले, तेव्हा तेथील एक शेतकरी जोरजोरात कर्जमाफी झालीच नसल्याचे सांगू लागला. दोन लाख रुपयांची कर्जमाफी झाली कुठे? कर्ज वसुलीसाठी माझ्या घरी तीनवेळा पोलीस येऊन गेलेत, असे त्याने सांगितले.
काँग्रेसचे कार्यकर्ते त्याला सिंधियांजवळ घेऊन गेले. सिंधियांनी या शेतकऱ्याला शांत बसण्यास सांगत जेव्हा बोलायला सांगने तेव्हा बोल असे म्हणाले. मात्र हा शेतकरी खाली बसण्यास तयार नव्हता.