ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव प्रतिबॅरल १५० डॉलरवरून घसरून २९ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे देशाची प्रचंड प्रमाणात पैशाची बचत झाली आहे, हा पैसा कुठे गेला असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
मुंबईमध्ये वीजदर स्वस्त व्हावेत यासाठी काँग्रेसने पदयात्रा काढली होती, जिचे नेतृत्व गांधींनी केले. त्यांनी धारावीमध्ये लघुउद्योजकांना भेटी दिल्या. प्लास्टिक, चर्मोद्योग, भांड्यांचे उद्योग अशा विविध क्षेत्रातल्या लघुउद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. खनिज तेलाच्या स्वस्ताईमुळे मिळालेला पैसा धारावीमध्ये का नाही खर्च केला असा प्रश्नही त्यांनी विचारला.
तूरडाळीचे बाव २०० रुपये किलोच्या आसपास आहेत, ते कमी का होत नाहीत याचं उत्तर मोदी व फडणवीसांनी द्यावं अशी मागणी राहूल गांधींनी केली. त्यांच्या पदयात्रेत हजारो नागरीक व कार्यकर्ते सामील जाले होते.
बड्या उद्योगांना सरकारचा वरदहस्त लाभतो, परंतु जे लघुउद्योजक मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करतात, त्यांना मात्र कुठल्याही सुविधा मिळत नाहीत असा आरोप राहूल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.