नवी दिल्ली : सरकारने मांडलेला अर्थसंकल्प केवळ गुलाबी चित्र आणि अर्धसत्य आहे. सरकारने दिलेली ‘अच्छे दिन’ची घोषणा त्यात कुठेही दिसली नाही. चांगले दिवस केवळ रा.स्व.संघाला आले आहेत. संघ हापपॅन्टमधून फुलपॅन्टवर आला आहे, अशा शब्दांत विरोधकांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पाची टर उडविली.लोकसभेत २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर यांनी अर्थसंकल्पाला पूर्णपैकी पूर्ण गुण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य बनविले. मोदी हेच परीक्षार्थी आणि परीक्षक होते, असा टोलाही त्यांनी हाणला. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी केलेली तरतूद पाहता हा अर्थसंकल्प अर्धसत्य ठरतो. केवळ रा.स्व. संघासाठी ‘अच्छे दिन’ आलेले आहे. संघ हापपॅन्टमधून फुलपॅन्टपर्यंत वाढला, असेही ते म्हणाले. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांच्या विरोधात आहे, असे काँग्रेसचे संतोकसिंग चौधरी यांनी स्पष्ट केले. राजदचे जयप्रकाश नारायण यादव यांनी हा अर्थसंकल्प दिशाहीन आणि पोकळ असल्याचे नमूद केले. अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा अभाव असून त्यात प. बंगालसाठी नवे असे काहीही नाही, याकडे तृणमूल काँग्रेसचे तापस मंडल यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर...विरोधकांनी पंतप्रधानांची कायम टर उडविण्याचे प्रकार चालविले आहेत. देशाला महाशक्ती बनविण्यासाठी पंतप्रधान १८ तास काम करीत आहेत, असे भाजपचे गणेशसिंग यांनी म्हटले. हा अर्थसंकल्प अतिशय सुधारणावादी असून सर्व समाजघटकांना आणि गरिबांना अनुकूल असा आहे, असे भाजपच्या पूनम महाजन यांनी म्हटले.शिवसेनेची मागणी सोन्याच्या दागिन्यांवर आकारलेले १ टक्का अबकारी शुल्क मागे घ्यावे. जीएसटी लागू होईपर्यंत हे शुल्क आकारले जाऊ नये,अशी मागणी शिवसेनेची राहुल शेवाळे यांनी केली. हा अर्थसंकल्प संतुलित असल्याची प्रतिक्रिया अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी दिली.