ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - देशामध्ये असहिष्णूता वाढत असल्याचा आरोप विरोधकांकडून उच्चारवाने होत असताना आणि साहित्यिक सरकारी पुरस्कार परत करत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशामध्ये शांततेने सहचर्य सुरू असून असहिष्णूता कुठे आहे असा प्रतिसवाल केला आहे.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय लढाई लढली पाहिजे आणि प्रत्येक घटनेचा संबंध केंद्र सरकारशी जोडता कामा नये असे मत व्यक्त केले आहे.
जगातली सगळ्यात चांगली जितीजागती लोकशाही भारतात आहे, प्रत्येकाला मुक्त संवादाचा व हवं तसं जीवन जगण्याचा अधिकार आहे असं असताना असहिष्णूता कुठे आहे असा सवाल जेटली यांनी केला आहे.
देशामधलं वातावरण चांगलं रहावं अशी आपली अपेक्षा असून केवळ भाषणबाजी करून असहिष्णूतेचं वातावरण रंगवता येणार नाही. केवळ म्हणायचं की असहिष्णूता आहे, कुठे आहे ती? जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मतं मांडली.
कर्नाटक व महाराष्ट्रातल्या ज्या घटनांचा दाखला दिला जात आहे त्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात घडल्याचे सांगताना ज्या कुणी हे गुन्हे केले आहेत, त्यांना कठोर शासन व्हायलात हवं असं मत व्यक्त केलं. मुख्य प्रवाहातल्या कोणीही अशा घटनांचं समर्थन केलेलं नसल्याचंही जेटली म्हणाले.
देशात सहिष्णूतेचे वातावरण असल्यामुळे व ते ते पुरस्कार त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनीच निवडलेल्या व्यक्तिंना दिलेले असल्यामुळे असे पुरस्कार परत करण्यात काही औचित्य नसल्याचे जेटलींनी सांगितले.