संजय शर्मा -
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून करणार आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान काही दिवस मुक्काम करून जनतेला संदेश देणार आहेत.
२०२४ ला सुरुवात होताच तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. जागांचा ताळमेळ आणि नेत्याच्या नावावर विरोधी पक्ष इंडिया आघाडीत एकमत होऊ शकले नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रत्येक जागेचे मूल्यमापन करून रणनीती तयार केली आहे. मोदी यांनी या महिन्यात तीन ते चार दिवस अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधानांनी अयोध्येत रोड शो, सभा, रेल्वे स्टेशन, विमानतळाचे उद्घाटन आणि अनेक योजनांचा शुभारंभ केला होता.
उत्तर भारताची चिंता नाही - पंतप्रधान मोदी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखली आहे. - पंतप्रधानांना उत्तर भारतातील राज्यांची फारशी चिंता नाही. या राज्यात २०१४ व २०१९ च्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. २०२४ मध्येही आव्हान नाही. - गेल्यावेळी भाजपला दक्षिणेतून लोकसभेच्या ३० जागा मिळाल्या होत्या. तेलंगणात गतवेळी ४ जागा जिंकल्या होत्या. यंदा १० जागांचे लक्ष्य ठेवले आहे.
दक्षिणेत भाजप करणार युती ज्या राज्यांत भाजप एकट्याने निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत नाही तेथे तो युती करू शकतो. तेलगू देसम पक्ष अद्याप इंडिया आघाडीत सामील झालेला नाही. टीडीपीसोबत आघाडी झाल्यास तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपला फायदा होईल. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकसोबत पुन्हा एकदा बोलणी सुरू आहे.