रुरकी : गंगा नदीच्या उगमाचे रहस्य नेमके आहे तरी काय हे शोधण्यास केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हायड्रोलॉजीतील (एनआयएच) वैज्ञानिकांना सांगितले आहे. गंगा नदी गंगोत्रीजवळील गोमुखातून उगम पावते की कैलास मानसरोवर येथून याचा शोध घ्या हे भारती यांनी त्यांना सांगितले आहे. साधारण समज असा आहे की गंगेचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्रीच्याजवळील गोमुखाच्या गुफेतून होतो. याच कारणामुळे गंगोत्रीला हिंदूंमध्ये पवित्र व तीर्थस्थळाचा मान आहे. भारती यांच्या आदेशानंतर गंगेच्या उगमाचे रहस्य खुले करण्यासाठी वॉटर आईसोटोप्स ट्रेसर तंत्राचा वापर केला जाईल, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. एनआयएचचे संचालक आर. डी. सिंह म्हणाले की,‘‘आम्ही नव्याने संशोधन करीत आहोत. गंगा मानसरोवरातून निघते का याचा शोध आम्ही वैज्ञानिक पातळीवर घेत आहोत. वॉटर आईसोटॉप्स तंत्राद्वारे मानसरोवरातून घेतलेले पाणी आणि गंगोत्रीचे पाणी यांचे विश्लेषण केल्यावर गंगेचा उगम खरोखर कुठून झाला हे समजू शकेल.’’ एनआयएचची एक प्रयोगशाळा गंगोत्री हिमखंडाजवळ भोजवासा येथे आहे. येथे गंगेसंबंधी अनेक संशोधने झाली. या संस्थेतील गंगोत्री हिमखंडाचे तज्ज्ञ मनोहर अरोरा म्हणाले की,‘‘आम्ही आजपर्यंत केलेल्या संशोधनातून हे कळते, की गंगेचा उगम हा गोमुखातून होतो. आम्हाला सांगण्यात आलेले काम हे खूपच आव्हानात्मक आहे, कारण आम्ही पूर्णपणे वेगळ्या दिशेने पुढे जात आहोत.’’ (वृत्तसंस्था)उमा भारती यांना गंगा नदीबद्दल वाटणारी उत्सुकता ही हिंदूंना या नदीबद्दल असणारी श्रद्धा व आदरात आहे. ती श्रद्धा अशी की, गंगेचा जन्म भगवान शंकराच्या जटेतून झाला. शंकराचे निवासस्थान हे मानसरोवराजवळील कैलास पर्वतावर आहे. उत्तराखंड संस्कृत अकादमीचे सचिव एस.सी. बहुगुणा म्हणाले की,‘‘ किती तरी प्राचीन गं्रथांमध्ये गंगा आणि मानसरोवर एक दुसऱ्याशी जोडले गेल्याचा उल्लेख आहे.’’ गोमुखापासून २०० किलोमीटरवरील अंतरावर गंगेचा जन्म झाला असणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? कारण गोमुखातूनच पहिल्यांदा गंगेचे पाणी बाहेर पडते व दिसतेही, असे विचारले असता आर. डी. सिंह म्हणाले की,‘‘ही शक्यता फेटाळून लावता येत नाही.’’
गंगेचा उगम कुठून ?
By admin | Published: October 30, 2015 10:15 PM