ऑनलाइन लोकमत
सासाराम, दि. ९ - पाटण्यात काल एका पोलिसावरच हल्ला झाला, ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचे काय हाल होतील असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर टीका केली. बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरल्याच्या पार्श्वभूमीवर सासाराम येथील सभेत ते बोलत होते.
गस्तीवर असलेले एएसपी राकेश कुमार यांच्यावर दोन अज्ञातांनी काल रात्री हल्ला केला, त्याचाच दाखला जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच जिथे हल्ला होते, तिथे सर्वसमान्यांचे काय होईल, असा सवाल विचारत पंतप्रधानांनी जंगलराज सरकारवर टीकास्त्र सोडले
या सभेत त्यांनी महाघाडीच्या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला. इतकी वर्ष जे नेते एकमेकांना पाण्यात होते ते आता खुर्चीसाठी एकत्र आले आहेत, सत्तेच्या मोहासाठी त्यांनी हे 'महास्वार्थबंधन' बनवले असल्याचे मोदी म्हणाले. या नेत्यांनी गेल्या ६० वर्षांत बिहारचे अतोनात नुकसान केले, राज्यातील अनेक उद्योग बंद पडल्याने लाखो तरूण रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात गेले आहेत. मात्र या नेत्यांना त्यांची चिंता नाहीये, त्यांना फक्त अपहरण करणं, खंडणी गोळा करणं हीच कामं येतात. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अपहरणाच्या तब्बल ४ हजार तक्रारी नोंदवल्या गेल्याचे नमूद करत तुम्हाला राज्यात पुन्हा 'जंगलराज' हवे आहे का असा सवाल जनतेला केला.
पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्यावेळी या नेत्यांनी तुम्हाला वीजेचे आश्वासन दिले होते आणि वीज न मिळाल्यास पुन्हा मत मागायला येणार नाही अशी वल्गनाही त्यांनी केली. आज पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही तुमच्याकडे वीज नाहीये आणि तरी हे नेते पुन्हा तुमच्या दारात मतांसाठी आले आहेत. आता तुम्ही त्यांना मत न देता जाब विचारा, असंही मोदी म्हणाले.
बिहारमध्ये गेल्या ६० वर्षात झालेले नुकसान मी ५ वर्षांत भरून काढेन, तुम्ही त्यांना ६० वर्ष दिली आता एनडीएला ६० महिने देऊन बघा. ही निवडणूक बिहारचे नुकसान करणा-यांना धडा शिकवण्यासाठी आहे, 'जंगलराज'पासून मुक्ती मिळवण्यासाठी विकासाचा एकच मार्ग तुमच्यासमोर आहे. एनडीएला बहुमताने विजयी करा आणि विकासाच्या मार्गावर पुढे पाऊल टाका, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.