जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची तुलना करत कुठे गंगू तेली असा टोला मोदींना लगावला आहे. बालदिनानिमित्ता आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अशोक गहलोत यांनी मोदींवर निशाणा साधला. ''सत्तेत येऊन चार महिनेच झाले असताना नरेंद्र मोदी मंगळयानाबाबत जणू ते त्यांनीच जादूने तयार केले असावे असेच बोलत होते.'' यावेळी गाईवरून होणाऱ्या वादांवरून संघाला टोला लगावला आहे. आरएसएसवाले गोमातेची शेपटी पकडून वैतरणी पार करू इच्छित आहेत, असे गहलोत म्हणाले. ''पंडित जवाहरलाल नेहरू 10 वर्षे तुरुंगात राहिले आणि 17 वर्षे त्यांना देशाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांच्यामुळेच देशात लोकशाही प्रस्थापित होऊ शकली. आज आरएसएसवाले हा देह तोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकशाही संपवू इच्छित आहेत. त्यामुळेच सर्वाधिक टीका ही नेहरूंवर केली जाते.''असे गहलोत यांनी सांगितले. ''माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्याविरोधात सोशल मीडियावरून द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे नव्या पिढीतील मुलांनी ही बाब समजून घेतली पाहिजे. माझ्या वक्तव्यांचीसुद्धा मोडतोड करून ती सोशल मीडियावर व्हाररल केली गेली होती. त्यावर मला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. अशा प्रकारची कृत्ये करणारी हीच मंडळी आहे. काँग्रेसच्या 70 वर्षांतील कार्यकाळावर भाजपाने चार महिन्यांत पाणी फिरवले आहे, असा टोलाही गहलोत यांनी लगावला.
कुठे राजा भोज आणि कुठे..., अशोक गहलोत यांचे नरेंद्र मोदींवर टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:20 AM