पटना : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 112 मुलांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 18 दिवसांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार रुग्णांच्या भेटीसाठी पोहोचल्याने काल टीकेचे धनी व्हावे लागले होते. मात्र, विरोधकांचे नेतेही अद्याप मुजफ्फरपूरमध्ये गेलेले नसल्याचे समोर येत आहे. लालू यादवांचा मुलगा तेजस्वी यादव कुठे आहेत असे विचारले असता त्यांच्या पक्षाच्या नेत्याने ते वर्ल्डकप पाहण्यासाठी गेले असल्याचे उत्तर मिळाले आहे.
बिहारच्या मंत्र्याने नुकतेच आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या बैठकीत स्कोअर काय झाला असे विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून सत्ताधारी जेडीयूवर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेले 18 दिवस न फिरकल्याने त्यांनाही रुग्णालय आवारात काऴे झेंडे आणि चले जावचे नारे ऐकावे लागले होते. यात आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राजद आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भर पडली आहे.
बिहारमध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू यावरून राजकारणही तापले आहे. लोकांमध्ये नितीशकुमारांविरोधात असंतोष आहे. यात विरोधी पक्षांची भुमिका महत्वाचा असताना तेजस्वी यादवांचे गायब होणे लोकांना खटकू लागले आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी तेजस्वी कुठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर राजदचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांनी सांगितले की, तेजस्वी यादव कदाचित वर्ल्ड कप पाहायला गेले आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह यांनी सांगितले की, मला नेमकी माहिती नाही की तेजस्वी कुठे आहेत. पण कदाचित ते वर्ल्डकप पाहण्यासाठी इग्लंडला गेले असावेत.
लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर तेजस्वी यादव गायब झाले आहेत. त्यांना शेवटचे 28 मे रोजी राबडी देवींच्या घरी पाहिले गेले होते.