नवी दिल्ली, दि. 9 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता जिथे स्वातंत्र्य नाही, ती जागा मला आवडत नाही अशी टीका केली आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या डोकलाम मुद्द्यावर बोलणं दलाई लामा यांनी टाळलं होतं. मात्र बुधवारी त्यांनी भाष्य करत हा मुद्दा इतका गंभीर नाही असं म्हटलं आहे. 'भारत आणि चीनला एकमेकांच्या शेजारीच राहायचं आहे. डोकलाम वाद हा काही इतका गंभीर विषय नाही', असं दलाई लामा बोलले आहेत.
'भारत आणि चीन मोठे देश असून कायम एकमेकांचे शेजारी राहणार आहे. त्यांनी एकत्र येणं फायद्याचं आहे', असं दलाई लामा यांनी सांगितलं आहे. 'शेवटी हिंदी - चिनी भाई भाई...हा एकमेव मार्ग उपलब्ध असून या शेजारी राष्ट्रांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही', असं दलाई लामा बोलले आहेत.
यावेळी बोलताना दलाई लामा यांनी स्वातंत्र्यावरही भाष्य केलं. भारतामध्ये ते मिळतं असं त्यांनी सांगितलं. 'या देशात स्वातंत्र्य उपलब्ध आहे. मी खूप काही करु शकतो आणि ते सर्वांसोबत शेअर करण्याचीही संधी उपलब्ध आहे. जिथे स्वातंत्र्य नाही, ती जागा मला आवडत नाही', असं चीनचं नाव न घेता दलाई लामा यांनी सांगितलं.
चीनही भविष्यात लोकशाही देश होईल अशी अपेक्षाही दलाई लामा यांनी व्यक्त केली. 'चीनी लोकांच्या इच्छेनुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लोकशाहीचा स्विकार करेल', असी अपेक्षा दलाई लामा यांनी व्यक्त केली.
भारताने डोकलाममध्ये चिनी लष्कराला रस्ता बनवण्यापासून रोखल्याने हा वाद सुरु झाला होता. चीन बनवत असलेला रस्ता हा भारत, भूतान आणि चीनच्या संयुक्त सीमेवर आहे. भारताने येथील रस्त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा रस्ता बांधून पूर्ण झाल्यास या मार्गाच्या मदतीने चीनी सैन्य भारताचा पूर्वेकडील राज्यांशी असलेला संपर्क तोडू शकतो अशी भारताला भीती आहे.