Delhi Assembly Election 2025 Result: सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर आज भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. परंतु, काँग्रेसचा हा भोपळाही आम आदमी पक्षाला भोवला आहे. अनेक जागांवर काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे आपचे उमेदवार थोडक्यात पराभूत झाले आहेत. त्यातून खुद्द अरविंद केजरीवालही सुटू शकले नाहीत.
भाजपाने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपाने निवडणुकीच्या प्रचारात भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. आम आदमी पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर अनेक नेते निवडून आले. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असताना मात्र आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा कुठेच दिसले नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
दिल्लीत आम आदमी पक्षाचे पानिपत होत असताना खासदार राघव चड्ढा कुठे होते?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी यांनी जनतेने दिलेला जनादेश स्वीकारत असल्याचे सांगितले. मात्र, दिल्लीत आम आदमी पक्षाचे संस्थान खालसा होत असताना नेहमी अरविंद केजरीवालांच्या बरोबर असणारे खासदार राघव चड्ढा कुठे दिसले नाहीत. त्यामुळे खासदार राघव चड्ढा नेमके कुठे आहेत? याबाबत चर्चांना उधाण आले होते. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीत एकत्र आहेत. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. मत विभाजन झाल्याने दोन्ही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारामुळे आम आदमी पक्षाचा उमेदवार थोडक्यासाठी पराभूत झाल्याचेही पाहायला मिळाले. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, म्हणजे पक्षाच्या कठीण काळात खासदार चड्ढा यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चड्ढा हे एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मुंबईत होते. अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या विवाह सोहळ्यात पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासह राघव चड्ढाही सहभागी झाले होते. एका बाजूला दिल्लीत आम आदमी पक्षाचे पानिपत होत असताना दुसरीकडे राघव चड्ढा विवाह सोहळ्याचा आनंद लुटताना पाहायला मिळाले.