नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सिंग यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून अटकेपासून संरक्षण देणारी याचिका केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सिंग यांच्या वकिलांना सुनावलं. परमबीर सिंग कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती न्यायालयाला द्या, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्यांनी देशाबाहेर पळ काढल्याचं बोललं जात आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं सिंग यांच्या वकिलांची झाडाझडती घेतली. 'याचिकाकर्ते जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत? ते या देशात आहेत की देशाबाहेर गेलेत? याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे,' असं न्यायमूर्ती एस. के. कौल म्हणाले.सिंग यांना सुरक्षित वाटल्यास ते समोर येतील, असा युक्तिवाद सिंग यांच्या वकिलांनी केला. त्यावरून न्यायमूर्तींनी वकिलांची कानउघाडणी केली. 'तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे ते पाहा. याचिकाकर्ते पोलीस आयुक्त होते. पण आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते भारतात प्रकट होतील, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?', असा सवाल न्यायमूर्ती कौल यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.