महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यापासून विविध नेत्यांकडून एकमेकांविरोधात प्रक्षोभक विधानं आणि वादग्रस्त टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेभाजपा नेते अमित शाह यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने बोचरी टीका करत आहेत. दरम्यान, भाजपाचे मध्य प्रदेशमधील नेते कैलाश विजयवर्गीय यांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच विजयवर्गीय यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधला.
कैलाश विजयवर्गीय यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिंदू विरोधी लोकांचे सहकारी असा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे हिंदूविरोधी लोकांचे सहकारी बनले आहेत. बाळासाहेब ठाकरे जिथे कुठे असतील, तिथून पाहून म्हणत असतील की, मी कशा मुलाला जन्म दिला. जो हिंदुत्वाविरोधात काम करत आहे. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट होते. तर उद्धव ठाकरे हे खुर्चीहृदयसम्राट आहेत. खुर्चीहृदयसम्राट उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी काहीही करू शकतात, असा टोलाही विजयवर्गीय यांनी लगावला.
कैलाश विजयवर्गीय यांनी यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावरही टीका केली. राहुल गांधींच्या राजकारणाबाबत विजयवर्गीय म्हणाले की, राहुल गांधी हे नकारात्मक राजकारण करत आहेत. ते देशाच्या हिताचं नाही आहे. तर अयोध्येत घडलेल्या घटनेमुळे समाजवादी पक्षासोबत कोणकोणते माफिया आहेत, हे स्पष्ट झालं आहे, असा आरोपही विजयवर्गीय यांनी केला.