कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:36 PM2024-02-11T18:36:51+5:302024-02-11T18:37:12+5:30
काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत.
पंजाबच्या खन्नामध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकर ७ही लोकसभेच्या जागा आपला देतील असे म्हणाले होते. यावरून आतापर्यंत शांत बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया आली आहे. लुधियानातील समरालामध्ये खर्गे यांनी कोणी सोबत आले तर ठीक, नाही तरी ठीक, एकट्यानेच निवडणूक लढवू असे वक्तव्य केले आहे.
काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत. असे असताना आता उरली सुरली आघाडीपण तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. चार महिन्यांपूर्वी एकजूट दाखविणारे विरोधी पक्ष कॅरमच्या सोंगट्यांप्रमाणे विखुरले आहेत. त्यांचा मुखिया तर भाजपासोबत जाऊन बसला आहे.
केजरीवाल यांनी पंजाब, चंदीगडमध्ये एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतही आजचे त्यांचे वक्तव्य काँग्रेसला बाजुलाच ठेवण्याचे आहे. यामुळे आता काँग्रेसनेही तलवार उपसली असून खर्गे यांनी देखील एकट्याच्या जिवावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आपसोबत आघाडी न करण्याची मागणी हायकमांडकडे केली होती. आपसोबत आघाडी करून लढल्यास त्याचा तोटाच होईल असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी उभी राहिली होती. कुठे कुठे आघाडी योग्य दिशेने सुरु आहे. काही ठिकाणी जुळत नाहीय. आता आम्हाला लढायचे आहे, हे समजून घ्या, असे खर्गे यांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे. शेवटपर्यंत लढून विजय मिळवायचा आहे. कोणी आले तरी ठीक आहे, कोणी नाही आले तरी ठीक आहे. संपूर्ण देशात आम्ही हा निर्णय घेतला आहे. हे फक्त पंजाबचे नाही. खंबीरपणे लढावे लागेल, असे खर्गे म्हणाले.