केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील वृद्धांचाही या योजनेत समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
गरीब असो वा श्रीमंत, या योजनेंतर्गत कुणीही 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आयुष्मान भारत योजनेत आधीपासूनच समावेश असला तरीही, कुटुंबातील 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध व्यक्तीलाही 5 लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र आरोग्य कवच मिळेल.
या आजारावर होणार मोफत उपचार? -आयुष्मान भारत योजनेंतर्गत अनेक अजारांवर मोफत उपचार मिळणार आहे. या आजारांत कॅन्सर, हार्ट डिसीज, किडनीशी संबंधित आजार, कोरोना, मोतीबिंदू, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, गुडघा आणि हिप प्रत्यारोपणास तब्बल 1760 प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. मात्र, सरकारने 196 आजारांना खासगी रुग्णालयात होणाऱ्या ट्रीटमेंटच्या लिस्टमधून हटवले होते. सरकारी रुग्णालयात या सर्व आजारांवर मोफत उपचार सुरू राहील.
असं तयार करा तुमचं कार्ड - आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी आपण पात्र आहात की नाही, हे सर्वप्रथम तपासावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in वर जा. होमपेजवर 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर सबमिट करावा लागेल. यानंतर नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. आता स्क्रीनवर तुमचे राज्य निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाका. यानंतर, तुम्ही पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
जर वेबसाईटवर ही प्रोसेस करणे शक्य होत नसेल तर, टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करून आपली पात्रता तपास. जर आपण पात्र असाल, तर आपल्याला जवळच्या कॉमन सर्व्हीस सेंटरवर (CSC) जाऊन कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.