नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयातही अनेकांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण यावरुन अनेक विनोद केले आहेत. अशातच लेखिका शोभा डे यांनीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरुन केलेलं ट्विट सोशल मिडीयात चांगलचं गाजतंय. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी राहिले काय की गेले काय? याने काय फरत पडतो. राहुल यांनी गेले पाहिजे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे असं लेखिका शोभा डे यांनी सांगितलं आहे.
शोभा डे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे. आता यु टर्न नको. सुट्टीचे दिवस त्यांनी कमविले आहेत. चौकीदारांनी त्यांचे काम करावे. भारत ते बघत आहे अशाप्रकारे शोभा डे यांनी राहुल गांधीसोबत चौकीदार शब्दावरुन मोदींनाही लक्ष्य केलं आहे.
शोभा डे या नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चेचा विषय बनतात. काही दिवसांपूर्वी शोभा डे यांनी ट्विटमधून अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांना टीकेचं लक्ष्य बनवलं होतं. त्यांनी ट्विट केलं होतं की, सनी देओल जिंकला. हेमा मालिनी जिंकल्या. आप, आरजेडी आणि जेडीएसपेक्षा जास्त खासदार धर्मेंद्रच्या घरात आहेत. त्यावरुनही शोभा डे चर्चेत आल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला होता. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती.
लोकसभेमध्ये मी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. तसेच मी कुठल्याही अन्य भूमिकेमध्येही काम करण्यास तयार आहे. पक्षाला भक्कम करण्यासाठी मी काम करत राहीन. मात्र अध्यक्षपदावर राहणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे आणि गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा द्यावी, तसेच स्वत: पक्षाचे काम करत राहावे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.