नवी दिल्ली -
लोकसभा निवडणुकीचे वातवरण तापत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी तुम्ही खुशाल रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करा, पण पंतप्रधान मोदींनी देखील राफेल कराराच्या भ्रष्टाचारावर उत्तर द्यावे, अशी मागणी राहुल यांनी चेन्नई येथे विद्यार्थ्यांशी सवांद साधताना केली.
राफेल करारातील हस्तक्षेपावरून अनेकदा पंतप्रधान मोदी यांचे नाव आले आहे. परंतु मोदींनी त्यावर चकार शब्द काढला नाही. याउलट रॉबर्ट वाड्रा भ्रष्टाचाराच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करत असल्याचे राहुल यांनी चेन्नई येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सरकारला प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात हस्तक्षेप केल्याचे कागपत्रे समोर आली आहेत. त्यावर मोदी यामध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. मात्र मोदींनी यावर अद्याप मौन बाळगले आहे. मोदी असो वा वाड्रा चौकशी सर्वांचीच व्हायला हवी, असे म्हणत राहुल यांनी मोदींच्या चौकशीची मागणी केली आहे.
आम्हाला देशाचा मूड बदलायचा आहे. देशाचा कल आर्थिक प्रगतीकडे आहे. परंतु विद्यमान भाजप सरकार आर्थिक प्रगतीवर बोलू इच्छित नसून त्यांचा भर देशात भिती निर्माण करण्यावर असल्याची टीका राहुल यांनी भाजवर केली आहे.