लोकसभा निवडणुकीनंतर, रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एडीए सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या समवेत एकूण ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. ६ हजारांहून अधिक पाहुणे या अद्भूत सोहळ्याचे साक्षिदार झाले. केवळ हे सहा हजार पाहुणेच नाही, तर एका 'अनामंत्रित' पाहुण्यानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जो प्राणी दिसत आहे, तो नेमका मांजर आहे, कुत्रा आहे की बिबट्या? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
व्हायरल होत असलेल्या या 12 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मंत्री दुर्गादास उईके शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. स्वक्षरी केल्यानंतर, ते उठतात आणि राष्ट्रपतींना नमस्कार करण्यासाठी जाऊ लागतात, त्याच वेळी त्यांच्या मागे असलेल्या पायऱ्यांवरून एक वन्य प्राणी जाताना दिसत आहे. मात्र, तो नेमका कोणता वन्य प्राणी आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तो मांजर, कुत्रा अथवा बिबट्या असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
जर तो प्राणी बिबट्या असेल, तर हा सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत चिंतेचा विषय आहे.