बंगळुरू- कर्नाटकाच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकतील एक दिवसाच्या दौ-यावर असून, त्यांनी धर्मस्थळ उजीरमध्ये एक सभा घेतली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले. मोदी म्हणाले, कोण्या एका पंतप्रधानानं सांगितलं होतं की दिल्लीतून जेव्हा एक व्यक्ती एक रुपया कमावतो, तेव्हा तो गावी पाठवेपर्यंत 15 पैशांवर येतो. या रुपयाला घासणारा पंजा कोणता आहे ?, तसेच तो कोणाचा पंजा आहे जो एक रुपयाला घासून 15 पैशांवर आणतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरळ सरळ काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार दिल्लीतून मिळालेल्या प्रत्येक नफ्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवते. आम्ही असू किंवा नसू, परंतु देशाला बदनाम होऊ देणार नाही. आम्ही स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी जगतो, असंही मोदी म्हणाले आहेत. मोदींनी डॉ. हेडगेवार यांच्यावरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणा-यांचेही आभार मानले आहेत. उजीरमध्ये ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या लाभार्थ्यांना रूपे कार्डही वितरीत केली आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू आणि बिदार येथे जनसभेला संबोधित करणार आहेत. बिदारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे लाइनचं उद्धाटनही करणार आहेत.
कोणता पंजा 1 रुपयाला झिजवून 15 पैशांवर आणतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 1:43 PM