Indian Railways Richest Station: भारतीय रेल्वेचे देशभरात प्रचंड मोठे जाळे आहे. शेकडो स्थानके, हजारो रेल्वेसेवा आणि कोट्यवधी प्रवासी यांमुळे भारतीय रेल्वेचा गाडा हाकणे अतिशय आव्हानात्मक आहे. भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे नेटवर्कचा इतका विस्तार केला आहे की, जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. रेल्वे फक्त तिकीट विकून पैसे कमावत नाही, तर अनेकविध मार्गांनी रेल्वे कोट्यवधी रुपयांची कमाई करते. यामध्ये रेल्वे स्थानकाच्या मिळकतीचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. भारतातील सर्वांत श्रीमंत रेल्वे स्थानक कोणते? वर्षाला किती होते कमाई? जाणून घेऊया...
भारतातील सर्व स्थानकांपैकी, नवी दिल्ली हे सर्वाधिक कमाई करणारे स्थानक आहे. रेल्वे स्टेशनच्या कमाईचा एक भाग नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणूनही ओळखला जातो. रेल्वेला ब्रँडिंग, प्रायोजकत्व, क्लॉक रूम आणि वेटिंग हॉलमधून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी महसूल वापरला जातो. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाची एकूण कमाई २,५०० कोटी म्हणजेच अंदाजे २५ अब्ज रुपये आहे. रेल्वेच्या कमाईचा मुख्य स्त्रोत प्रवासी आणि मालवाहतूक आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे या मार्गाने दरवर्षी सुमारे ६० हजार कोटी रुपये कमावते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणती स्थानके?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकानंतर, हावडा रेल्वे स्थानक कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक आहे. कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर सिकंदराबाद रेल्वे स्थानक आहे तर पाचव्या स्थानावर अहमदाबाद रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकांची कमाई १ हजार कोटी ते १८०० कोटी रुपयांपर्यंत आहे. २०२२-२३ या वर्षाच्या संदर्भात, रेल्वे बोर्डाने माहिती दिली होती की, या स्थानकांनी सुमारे १ लाख ७४ हजार कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये रेल्वे काउंटरवरून तिकीट बुकिंगच्या कमाईचा समावेश नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"