बिहारचे मुख्यमंत्री नितीस कुमार हे पाटणा युनिव्हर्सिटीमध्ये एका उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले आणि खाली पडण्यापूर्वी सावरले. यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे सुद्धा उपस्थित होते.
नितीश कुमार यांचा पडतानाचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. यामध्ये नितीश कुमार हे शिक्षक दिनानिमित्त पाटणा विद्यापीठातील व्हिलर सिनेट हाऊसचं उद्घाटन करण्यासाठी आलेले दिसत आहेत. यादरम्यान, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हेही उपस्थित होते. दोन्ही नेते उद्घाटन फलकाचं अनावरण करण्यासाठी दोरी ओढत असतानाच नितीश कुमार यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले.
त्यानंतर तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. सावरून उभे राहिल्यानंतर नितीश कुमार यांनी या हॉलचं उद्घाटन केलं. तसेच राज्यपालांसोबत उभं राहून फोटोही काढले. नितीश कुमार जिथे उभे राहून दोरी ओढत होते. ती जागा सपाट नव्हती. त्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने यात त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.