म्हैसूर : अयोध्या येथील राममंदिरात म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगिराज यांनी बनविलेली रामललाची मूर्ती विराजमान होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. छिन्नीकाम करताना दगडाचा एक अगदी छोटा तुकडा अरुण योगीराज यांच्या डोळ्यात शिरला होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
अरुण योगीराज यांची आई सरस्वती यांनी सांंगितले की, माझ्या मुलाने केलेली रामललाची मूर्ती राममंदिरात विराजमान होणार हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. याआधी अरुण योगीराज यांनी बनविलेला आदी शंकराचार्य यांचा पुतळा केदारनाथ येथे तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा बनविलेला पुतळा दिल्लीतील इंडिया गेटनजीक बसविण्यात आला आहे.
अनेक रात्री जागून काढल्यारामललाची मूर्ती बनवत असताना अरुण योगीराज यांच्या डोळ्याला जखम झाली होती. छिन्नीकाम करताना दगडाचा एक अगदी छोटा तुकडा अरुण योगीराज यांच्या डोळ्यात शिरला होता. तो तुकडा शस्त्रक्रियेने काढावा लागला. त्यानंतरही डोळ्याला वेदना होत असूनही योगीराज यांनी काम थांबविले नाही. रामलल्लाची मूर्ती कशी असावी याबाबत ते अहोरात्र विचार करत असत. अनेकदा त्यांनी त्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या आहेत.