सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यापासून रील बनवण्याच्या नादात होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. झारखंडमधीस साहीबगंज जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रील बनवण्यासाठी एका तरुणाने १०० फूट उंच कड्यावरून पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून तो मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला.
साहिबगंज जिल्ह्यातील जिरवाबाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेल्या करम पहाड जवळ एक दगडांची खाण आहे. येथे पाणी साटून एक तलाव तयार झालेलं आहे. दरम्यान, तौसिफ नावाच तरुण आपल्या काही मित्रांसोबत तिथे आंघोळीसाठी आला होता. यादरम्यान, त्याने खोदाकामामुळे तयार झालेल्या १०० फूट उंच कड्यावरून खोल पाण्यात उडी मारली. मात्र पाणी खूप असल्याने तो बुडाला. सोमवारी संध्याकाळी सुमारे साडे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे प्रभारी अनिष पांडे यांना देण्यात आली.
त्यानंतर स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. खूप शोध घेतल्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. मृत तरुण हा मित्रांसोबत रिल बनवत होता, त्यादरम्यान १०० फूट उंचीवरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस तपासामधून समोर आली. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या घटनेबाबत पोलीस उपअधिक्षक विजय कुमार कुशवाहा यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी तौसिफ हा तरुण काही मित्रांसह एका दगडाच्या खाणीत पोहायला गेला होता. त्यावेळी त्याचे काही मित्र व्हिडीओ तयार करत होते. या दरम्यान १०० फूट उंचावरून पाण्यात उडी मारल्यानंतर तौसिफला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.