नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून देशपातळीवर आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसला आज एक जबरदस्त धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधील सर्व पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामधून आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत.
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका करत आरोपांची फैर झाडली. ते म्हणाले की, जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे आणि २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले. सध्या राहुल गांधी हे अननुभवी लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेलेले आहेत.
काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असा गंभीर आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला.
आझाद यांनी आपल्या पाच पानांच्या राजीनामा पत्रामध्ये लिहिले की, काँग्रेस पक्ष आता अशा स्थितीत पोहोचला आहे जिथून पुनरागमन करणे कठीण आहे. त्यांनी लिहिले की, संपूर्ण संघटनात्मक प्रक्रिया केवळ एक देखावा आहे. देशात कुठेह संघटनात्मक पातळीवर निवडणुका झालेल्या नाही आहे. २४ अकबर रोड येथे बसून पक्ष चालवणाऱ्या चापलूस मंडळींना तयार केलेल्या याद्यांवर हस्ताक्षर करण्यासाठी एआयसीसीच्या निवडक लेफ्टिनंटना भाग पाडले जात आहे, असा आरोपही आझाद यांनी केला.