पाटणा - बाईकवरुन प्रवास करताना मोबाईलवर बोलणे किंवा रस्त्यावरुन चालताना इयरफोन वापरणे हे अनेकदा जीवावर बेतल्याचे आपण पाहिलं आहे. मात्र, यातून आपण काही शिकतो की नाही? हाच खरा प्रश्न आहे. बिहारमधील बेगुसराय येथे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक चालवताना ईयरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा आवाजच या युवकाला लक्षात आला नाही. त्यामुळे, भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने तरुणाला चिरडले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता. मात्र, कानात ईअरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा अंदाजच या युवकाला आला नाही. ट्रकचालकाने सातत्याने हॉर्न वाजवले, पण तरुणाच्या तेही लक्षात आले नाही. त्यातच, ट्रकचालकाने गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात संबंधित दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. त्यामुळे गाडीसह तरुण रस्त्यावर पडला, त्यात त्याचे दोन्ही पाय ट्रकच्या पायाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. या अवस्थेतही तरुणाने आपल्या खिशातून मोबाईल काढून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आपल्या पत्नीला पाहून शेवटचे शब्द बोलत अखेरचा श्वास घेतला. तरुणाचा असा दुर्दैवी आणि मन हेलावणारा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे.
राजाराम पंडित असे या युवकाचे नाव असून तीन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राजारामला एक 7 महिन्यांची मुलगीही आहे. मात्र, वडिलांच्या एका चुकीमुळे तिने आपले वडिल कायमचे गमावले आहेत. राजाराम आपल्या मेव्हण्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी सासूरवाडीकडे निघाला होता. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अति रक्तश्रावामुळे त्याचा जीव गेला.