इंदौर : मध्य प्रदेशमधील इंदौर महापालिकेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी नगरसेवकांदरम्यान राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये संभ्रम निर्माण झाला. बुधवारी वंदे मातरम हे गीत सुरु झाले आणि नगरसेवकांनी मधुनच जन गण मन म्हणायला सुरुवात केली. यामुळे गोंधळ उडाल्याने नगरसेवकांना थांबवून पुन्हा वंदे मातरम हे गीत पूर्ण करण्यात आले. यामुळे अर्थसंकल्प मांडण्याआधीच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये महापौर आणि भाजपा आमदार मालिनी गौड, पालिका आयुक्त आशिष सिंह, अध्यक्ष अजयसिंह नरुका आणि अन्य नगरसेवक दिसत आहेत. राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी पालिका आयुक्त आशिष सिंह यांच्याकडे कारवाईची मागणी केली. दोषींवर कारवाई करावी, त्यांना माफ केले जाऊ शकत नाही. राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीत गातेवेळी जाणूनबुजून व्यत्यय आणल्यास तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
नरुका यांनी यावर स्पष्टीकरण देताना नगरसेवकांची जीभ घसरल्यामुळे ही चूक झाली. यामागे काही वाईट हेतू असेल असे वाटत नाही, असे सांगितले. तसेच पालिकेच्या परंपरेनुसार अर्थसंकल्प मांडताना वंदे मातरमने सुरुवात केली जाते आणि जन गण मन गाऊन संपविले जाते, असेही ते म्हणाले. इंदोर पालिकेवर भाजपाची सत्ता आहे.