नवी दिल्ली - भारताय सैन्यातील बीएसएफ हे सैन्य दल जगातील सर्वात मोठी लष्कर सेना आहे. देशाची सुरक्षा आणि देशनिष्ठा यांप्रती या दलाचं कार्य कधीही न विसरता येणारं आहे. आजही देशातील शहीद जवानांमध्ये बीएसएफच्या जवानांची संख्या सर्वाधिक दिसून येते. देशसेवेसाठी आपलं जीवन वाहून नेणाऱ्या या जवानांना कधीही आराम मिळत नाही. मात्र, कधी आराम मिळालाच, तर तोही असा. जवानांचा हा फोटो सध्या इंटरनेटवर बेस्ट ठरत आहे.
देशातील बीएसएफच्या जवानांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सातत्याने प्रशिक्षण किंवा दौरा यांमध्येच जवानांच जगणं सुरू असतं. या फोटोमध्ये बीएसएफचे 15 जवान त्यांच्या सामानासहित एका खोलीत विश्रांती घेत असल्याचं दिसून येतंय. मात्र, चिंतेची बाब म्हणजे या जवानांना आरामासाठीही निटनिटकी सुविधा मिळत नाही. कारण, केवळ 5-7 जणांसाठी पुरेल, एवढ्याच जागेत हे 15 जवान आखडून, जमेल तसं आराम करताना दिसत आहेत. जवानांच्या या फोटोवरुन नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. जवानांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा आणि देशातील जवानांप्रती सरकारला असणारी आस्था याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटरवरुन अनेकांनी सरकारला या फोटोला शेअर करत जाब विचारला आहे. तर अनेकांनी आपण नेहमीच तक्रारी करतो, पण जवानांकडून काहीतरी शिकायला हवं, असे म्हणत हा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान, यापूर्वीही एका जवानाने खराब जेवण मिळत असल्याची तक्रारा एका व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर, लोकसभेत याचे पडसाद उमटले होते. तर, खुद्द गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही त्या व्हिडीओची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आताही, जवानांच्या या व्हायरल फोटोला पाहून सरकार प्रशिक्षण काळात आणि कर्तव्यावर असतानाही जवानांना उत्तम सुविधा पुरवणार का, हा खरा प्रश्न आहे.
जवानांच्या कार्याला सलाम, त्यांच्या धैर्याला सलाम, त्यांच्या देशनिष्ठेला सलाम, त्यांच्या जीवन जगण्याला सलाम. मिळेल ते खाऊन, भेटल तसे राहून देशसेवेसाठी आयुष्य जगणाऱ्या या तरुणांना सलाम, अशा भावना फेसबुक आणि ट्विटरवरुन व्यक्त होत आहेत. आपण नेहमीच हे मिळालं नाही, किंवा ते मिळालं नाही, म्हणत तक्रार करतो. पण, जवानांचा हा फोटो पाहिल्यानंतर आपल्याला मिळतंय ते यांच्यापेक्षा नक्कीच उत्तम असते, याची जाणीव हा फोटो पाहिल्यावर होईल.