भोपाल:मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील देवरी धरणात एक आश्चर्यकारक दृष्य पाहायला मिळाले आहे. सोमवारी धरणावरील पाण्याची वावटळ तयार झाली आणि या वावटळीने थेट आकाशाला गवसणी घातली. या घटनेची माहिती मिळताच दूरवरुन शेकडो लोक हे दुर्मिळ दृष्य पाहायला येऊ लागले. यावेळी अनेकांनी या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला.
हे दृष्य पाहून काहीजण त्याला दैवी चमत्कार तर काहीजण दुर्मिळ वैज्ञानिक घटना म्हणत आहेत. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील देवरी धरणात हा हजारो फूट उंचीचा पाण्याचा स्तंभ दृष्टीक्षेपात मावत नव्हता. ज्याप्रमाणे वादळामध्ये जोरदार वारे आणि धूळ यांचे वावटळ निर्माण होते आणि त्यात येणारी प्रत्येक गोष्ट उडून जाते. तशाच प्रकारे, या पाण्याच्या वावटळीने उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाढवले.
गावकरी या घटनेला देवाचा चमत्कार म्हणत आहेत. तर, अधिकाऱ्यांनी या पाण्याच्या वावटळीजवळ न जाण्याचा इशारा दिला आहे. हिरव्या शेतात पाण्याच्या वावटळीचे दृष्य एखाद्या गगनचुंबी कारंजासारखे दिसत होते. एनडीटीव्हीकडून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला असून, व्हिडिओ 24 तासांपेक्षा कमी वेळात व्हायरल झाला.