कुजबुज..
By admin | Published: December 25, 2015 2:57 AM
बेकायदा सभागृहात पालिका प्रशासनाची बैठक
बेकायदा सभागृहात पालिका प्रशासनाची बैठककुंकळ्ळी व इतर पालिका क्षेत्रातील सफाई मोहिमेसंबंधी चर्चा करण्यासाठी कुंकळ्ळी पालिकेने स्वत:ची दोन सभागृहे असताना बेकायदा पद्धतीने बांधकाम केलेल्या एका खासगी सभागृहात सरकारी बैठक घेतली. सध्या कुंकळ्ळीत हा चर्चेचा विषय बनला आहे. कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी पंढरीनाथ नाईक यांच्यासह जीसुडाचे अधिकारी अनिल रिंगणे व इतर अधिकारी व कुंकळ्ळीच्या नगराध्यक्ष लविता मास्कारेन्हस, उपाध्यक्ष व इतर नगरसेवक बैठकीस उपस्थित होते. चर्चा संपल्यावर उपस्थितांपैकी कुणीतरी सफाई मोहिमेची ही बैठक बेकायदा खासगी सभागृहात घेतल्याबद्दल पालिका अधिकार्यांना जाब विचारला. हे बेकायदा सभागृह एका नगरसेवकानेच उभारलेले आहे. एका बिगर सरकारी संस्थेने या प्रकरणी पालिका प्रशासनाला जाब विचारला असून आता पालिका प्रशासनच जर बेकायदा कृत्यांना पाठिंबा द्यायला लागले तर सामान्यांनी कुणाकडे पाहावे. एकूणच कुंकळ्ळीत सध्या ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार सुरू आहे.-----------------बाबू कुंकळ्ळीत येणार!कुंकळ्ळीत सध्या आमदार बनण्यास इच्छुक असलेले गुडघ्यास बशिंग बांधून बसले आहेत. आमदार राजनभाई यांच्यासह माजी आमदार ज्योकिम आलेमाव, क्लेफासियो डायस, देवेंद्र देसाई, जॉन मोंतेरो, माजी पोलीस अधीक्षक टोनी फर्नांडिस धडाक्यात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आता या यादीत केपेचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांचे नाव घेतले जात आहे. केपे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची शक्यता असून आमदार बाबू कवळेकर आता आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. आमदार कवळेकर यांच्यासाठी कुंकळ्ळी मतदारसंघ सुरक्षित असून पूर्वीच्या केपे मतदारसंघाचा काही भाग आंबावली पंचायत व बाळ्ळी पंचायत कुंकळ्ळी मतदारसंघात आल्यामुळे कवळेकरांनी या मतदारसंघात येण्याचे ठरविले असल्याचे कळते. आमदार कवळेकर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांना जवळचे असून कुंकळ्ळीत चाललेली अंतर्गत लढाई पाहून प्रदेश अध्यक्षांनी आमदार कवळेकरांना कुंकळ्ळीची कमान सोपविण्याचे ठरविले असल्याचे कळते. बाबूच्या एंट्रीमुळे कुंकळ्ळीची लढाई अटीतटीची होण्याची शक्यता आहे.