नवी दिल्ली : संदेश पाठविण्यासाठी सध्याच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअॅपने जगातील १०९ देशांमध्ये आपले जाळे पसरवले आहे. मेसेजिंग सेवेसाठी सोपे असल्यामुळे व्हॉट्सअॅपला ही पसंती मिळत आहे. हे अॅप जगातील १०९ देशांमध्ये वापरले जात असल्याचे सिमिलर वेब या डिजिटल मार्केटिंग इंटेलिजन्स कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. भारतामध्ये ९४.८ टक्के अॅण्ड्रॉइड मोबाइल फोन्समध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड केले असून दिवसातील सरासरी ३७ मिनिटे त्याचा वापर होतो असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.हे सर्वेक्षण जगातील १८७ देशांमध्ये करण्यात आले. त्यातील १०९ देशांमध्ये म्हणजे ५५.६ टक्के प्रदेशात व्हॉट्सअॅपलाच प्राधान्य मिळाले आहे. भारताप्रमाणे ब्राझील, मेक्सिको, युनायटेड किंगडम, रशिया व दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये व्हॉट्सअॅपचा मोठा वापर होत आहे.दहा देशांपेक्षा लोकप्रिय अस्तित्व असणाऱ्या मेसेंजर अॅप्समध्ये वायबर आहे. पूर्व युरोपातील लोकांची वायबरला अधिक पसंती आहे. बेलारूस, माल्दोवा, युक्रेन व इतर देशांंमध्ये ते प्रथम क्रमांकावर आहे. युक्रेनमध्ये असणाऱ्या अॅण्ड्रॉइड मोबाइल संचांमध्ये ६५ टक्के संचांमध्ये वायबर डाऊनलोड केलेले असून दिवसाकाठी सरासरी १६ मिनिटे त्याचा वापर होत असल्याचे एप्रिल २०१६ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. वायबर इराक, लिबिया, श्रीलंका अशा देशांमध्येही लोकप्रिय होत आहे. व्हॉट्सअॅपनंतर फेसबुक मेसेंजरचा नंबर लागतो. अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया यांच्यासह ४९ देशांमध्ये त्याचे अस्तित्व आहे.लाइन, वीचॅट, टेलेग्राम ही चॅट, मेसेजिंग अॅप्सदेखील चीन, इराण, जपान अशा देशांमध्ये वापरली जात आहेत. जपानी लोकांमध्ये लाइन विशेष आवडीचे अॅप दिसून येते.
निम्म्या जगावर व्हॉट्सअॅपने घातली भुरळ
By admin | Published: May 26, 2016 1:59 AM