नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर पाठविल्या जाणाऱ्या संदेशांचा उगम कोणाकडून झाला याचा शोध घेणारे सॉफ्टवेअर बनवू शकत नसल्याचे, व्हॉट्सअॅपने सरकारला सांगितले आहे. कारण युजर्सकडून त्यांच्या खासगी संदेशांची देवाण-घेवाण सुरु असते. यामुळे त्यांच्या संवेदनशील संदेशांचा खासगीपणा संपेल असे कारण व्हॉट्सअॅपने दिले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गेल्या मंगळवारी व्हॉट्सअॅपचे कार्यकारी अधिकारी क्रीस डॅनिअल यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी देशामध्ये होणाऱ्या दंगली, अफवा आणि जमावाकडून होणारी मारहाण रोखण्यासाठी किंवा बदनामीच्या उद्देशाने पाठविलेले संदेश रोखण्यासाठी उपाययोजना शोधण्याची विनंती केली होती. तसेच पहिला मॅसेज पाठविणाऱ्याचा शोध घेण्य़ासाठी सॉफ्टवेअर बनविण्यास सांगितले होते.
यावर कंपनीने आज उत्तर पाठविले आहे. मॅसेजला ट्रेस करणारी सिस्टिम विकसित करून आम्ही खासगीपणाचे नुकसान करू शकत नाही. आणि असे करून आम्ही बनविलेल्या खासगीपणाच्या नियमांचे उल्लंघन करु इच्छित नसल्याचे सांगितले आहे. या तंत्राचा कोणीही गैरफायदा उठविण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.