नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'फादर ऑफ इंडिया' अशी उपाधी दिली होती. मात्र या उपाधीवरून आता देशात उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे काँग्रेसने मोदींना दिलेल्या या उपाधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मात्र 'मोदींना मिळालेल्या फादर ऑफ इंडिया उपाधीबाबत अभिमान न बाळगणारे भारतीय नाहीत,' असे विधान केले आहे. मोदींना देण्यात आलेल्या उपाधीवर काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांना प्रत्युत्तर देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, 'कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने पहिल्यांदाच फादर ऑफ इंडियासारख्या शब्दाचा वापर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या उपाधीचा ज्यांना अभिमान वाटत नाही. ते स्वत:ला भारतीय मानत नाहीत, असे मला वाटते.'' डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुक करत त्यांचा 'फादर ऑफ इंडिया' असा उल्लेख केला होता. त्यांनी मोदींची तुलना अमेरिकन गायक आणि अभिनेते एल्विस प्रेस्लीसोबत केली. मोदी भारतात एल्विस प्रेस्लीसारखे लोकप्रिय आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी दहशतवादाबद्दल घेतलेल्या भूमिकेचीही ट्रम्प यांनी प्रशंसा केली. दहशतवादाबद्दलची मोदींची भूमिका अतिशय कठोर होती आणि त्यांनी ती अतिशय स्पष्टपणे मांडली, असं ट्रम्प म्हणाले.
मोदींना दिलेल्या 'फादर ऑफ इंडिया' उपाधीचा अभिमान न बाळगणारे भारतीय नाहीत -जितेंद्र सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:08 PM