मुंबई, दि. 7- 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच अबू सालेमला दोन लाखांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. अबू सालेम बॉम्बस्फोट प्रकरणाबरोबरच त्याच्या प्रेमप्रकरणांमुळेही चर्चेत आला. अबू सालेमचं खासगी आयुष्य हे एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा वेगळं नाही. सालेमच्या आयुष्यातील त्या दोघी आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना होता. कालांतराने त्याची माहिती लोकांना मिळालीसुद्धा. पण आता पुन्हा एकदा अबू सालेमची पहिली पत्नी समाइरा जुमानी तसंच अभिनेत्री मोनिका बेदी या दोघींबद्दल चर्चा सुरू आहे.
अबू सालेमची पहिली पत्नी समाइरा जुमानी आहे तरी कोण ?समाइरा जुमानी ही अबू सालेमची पहिली पत्नी होती. अंधेरीमध्ये राहणाऱ्या समाइराचं तिच्या वयाच्या 17 व्या वर्षी अबू सालेमबरोबर लग्न झालं होतं.अबू सालेमच्या या पहिल्या पत्नीवर अनेकांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल करणं, बॉम्बस्फोट आणि घोटाळ्यांमध्ये मोठा सहभाग होता. तसंच या गुन्ह्यांचा आरोप असलेली समाइरा यूएस मध्ये फरार असल्याची चर्चा आहे. 2005 साली एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत समाइराने अबू सालेमसह असलेल्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. माझं आणि अबू सालेमचं वैवाहिक आयुष्य कधीच सुखाचं नव्हतं, असं समाइराने म्हंटलं होतं. आम्ही कधी एकत्र जेवलोही नाही. अबू सालेमच्या अशा वागणुकीमध्ये मला टिपिकल लग्न झालेल्या मुलीप्रमाणे कधीच वाटलं नाही, असंही ती म्हणाली होती. मी स्वतःहून अबू सालेमशी विवाह केला, अशी सगळ्यांची समजूत होती. पण आमच्या लग्नाबद्दलचं सत्य एकदम उलट आहे. अबू सालेमबरोबर मी एक मिनिटंसुद्धा वैवाहिक आयुष्य जगले नाही, असं तिनं म्हंटलं. लग्नानंतर सालेम नेहमी उपकार केल्याची भाषा वापरायचा. त्याने मला दिलेलं घर, इतर सुविधा याबद्दल तो सतत आठवण करून द्यायचा. 'मेरा एहसान है तुझ पर' हे वाक्य मी नेहमी ऐकत असल्याचं तिने सांगितलं. अबू सालेमला कुठल्याही परिस्थितीत प्रसिद्ध व्हायचं होतं. स्वतःला डॉन म्हणवून घ्यायचं होतं, असंही तिने सांगितलं. दुबईमध्ये दाऊद इब्राहीम ठेवत असलेल्या पार्ट्यांमध्ये सालेम समाइराला घेऊन जायचा पण तिथे डी कंपनीतील मित्रांसमोर तोंड बंद करून राहायला सांगायचा. असे अनेक अनुभव समाइराने या मुलाखतीत सांगितले होते. अबू सालेमने एकदा केलेल्या मारहाणीमुळे तिच्या डोक्यावर सात टाके पडले होते. तसंच मुलाबरोबरही त्याची वागणूक योग्य नव्हती. मुलाशी त्याला काही देणघेण नसल्याचं तिने सांगितलं. अबू सालेमचे मोनिका बेदीशी शारीरिक संबंध होते, असा खुलासा समाइरा जुमानीने या मुलाखतीत केला होता.
मोनिका बेदी आणि अबू सालेमचं प्रेमप्रकरणवयाच्या २० व्या वर्षी अभिनेत्री मोनिका बेदी हिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. १८ जानेवारी १९४५ ला पंजाबच्या होशियारपुरमध्ये जन्मलेली मोनिका आणि डॉन अबू सालेम यांचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय होते. ती अबू सालेमला कशी भेटली आणि कशाप्रकारे त्याने तिला सिनेमे मिळवून दिले हे जाणून घ्यायची आजही अनेकांना उत्सुकता असते.‘एक दिवस मला दुबईवरुन फोन आला आणि त्याने सांगितलं की तो एक कार्यक्रम आयोजित करत आहे, ज्यात मीही सहभागी व्हावं. त्या माणसाने पुढे सांगितले की, सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर तो मला पुन्हा फोन करेल. काही दिवसांनंतर त्या माणसाने पुन्हा फोन केला आणि थोडा वेळ बोलत होता. काही दिवसांनी परत त्याचा फोन आला. यावेळी आम्ही फार सहजरित्या एकमेकांशी बोलत होतो. त्याने त्याचं नाव काही तरी वेगळंच सांगितलं होतं. त्यावेळी फोनवर बोलणारा तो अबू सालेम असल्याची मला कल्पना नव्हती. दुबईवरुन फोन करणाऱ्या व्यक्तिला भेटण्याआधीच ती त्याला पसंत करु लागली होती. ती नेहमीच त्याच्या फोनची वाट बघायची, अशी माहिती २००८ मध्ये रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने दिली होती. काही काळानंतर मोनिकाचं दुबईला जाणं वाढलं. तिच्यात आणि सालेममध्ये कालांतराने जवळीक निर्माण झाली. साधारणपणे १९९५ मध्ये मोनिकाने तिच्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. पण सालेमला भेटेपर्यंत तिचा एकही सिनेमा फारसा गाजला नव्हता. मोनिकाच्या प्रेमात पडल्यानंतर सालेमनेच तिला मोठ्या सिनेमात भूमिका द्यायला मदत केली होती, अशी चर्चा आहे. १९९९ मध्ये आलेला सलमान खानचा ‘जानम समझा करो’ या सिनेमात मोनिकाला रोल मिळवून देण्यात सालेमचा फार मोठा हात होता, अशी ही चर्चा आहे. 2001 साली संजय दत्त आणि गोविंदा यांचा ‘जोडी नंबर १’ या सिनेमात सालेमच्या सांगण्यावरुनच मोनिकाला ती भूमिका मिळाली होती. १८ नोव्हेंबर २००२ मध्ये पोर्तुगाल पोलिसांनी सालेम आणि मोनिका यांना पकडलं आणि त्यांना भारताकडे सुपूर्द केलं. २००६ मध्ये मोनिकाला बनावट पासपोर्टप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि तिला शिक्षा सुनावली गेली. मोनिकाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानेही तिला दोषी ठरवले, परंतु तिची शिक्षा कमी करण्यात आली.