- शीलेश शर्मानवी दिल्ली : ‘कई जवाबोंसे अच्छी है खामोशी उसकी, न जाने कितने सवालों की आबरू रखली’, असे टष्ट्वीट करीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विकास दुबेच्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटरच्या पटकथेमागे कोण आहे, असा सवाल उपस्थित करीत संपूर्ण विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तहसीन पूनावाला यांनी या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वकील घनश्याम उपाध्याय यांनी गुरुवारीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विकास दुबेला संरक्षण देण्याची मागणी केली होती. दुबेचा एन्काऊंटर करण्यात येऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काही कारवाई होण्याआधीच दुबेचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात आला.गुन्हेगार-राजकारणी यांचे लागेबांधे यावेत -प्रियांका गांधीया संपूर्ण प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे.सर्व विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकारला विविध प्रश्न केले असून, त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली आहे. त्याला पळायचेच होते, तर त्याने उज्जैनमध्ये शरणागती का पत्करली असती? त्याच्याजवळ असे कोणते रहस्य होते की, ज्यामुळे त्याचे एन्काऊंटर करण्यात आला? त्याला एका गाडीतून दुसऱ्या गाडीत का बसविण्यात आले?भाजप सरकारने उत्तर प्रदेशला गुन्हेगारी प्रदेशमध्ये बदलल्याचे संपूर्ण देश पाहत आहे. सरकारी आकड्यांनुसार उत्तर प्रदेश बालकांवरील अत्याचारात क्रमांक एकवर आहे. महिलांवरील अत्याचाराबाबतही तेच आहे. अवैध कृत्ये व शस्त्रांच्या तस्करीतही क्रमांक एकवर आहे. हत्यांमध्येही तेच आहे. ही राज्याची स्थिती आहे. कायदा व्यवस्था खूपच बिघडली आहे. या स्थितीतच विकास दुबेसारखे गुन्हेगार वाढताहेत. संपूर्ण राज्याला माहिती आहे की, अशा लोकांना राजकीय संरक्षण आहे.विकास दुबेसारख्या गुन्हेगारांची वाढ कशी होते, ते कसे मोठे होतात, याचे सत्य समोर आले पाहिजे. गुन्हेगार व राजकीय नेत्यांमधील लागेबांधे उघड झाले, तरच हे शक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.ट्रान्झिट रिमांड नव्हता?विकास दुबे याला मध्यप्रदेश पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडशिवाय उत्तर प्रदेश एसटीएफकडे सोपविले होते. तथापि, भादंविच्या कलम ७२ नुसार जर दुसºया राज्यातील पोलीस आरोपीला अटक करत असेल तर त्या आरोपीला स्थानिक न्यायालयात २४ तासांच्या आत हजर केले जावे. स्थानिक न्यायालयातून प्रत्यर्पणाची परवानगी घेऊन आरोपीला दुसºया राज्यात घेऊन जाता येऊ शकते. प्रत्यर्पणाच्या या परवानगीलाच ट्रान्झिट रिमांड म्हटले जाते.अमिताभ यश यांनी केले एन्काऊंटरचे नेतृत्वविकासचे एन्काऊंटर करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मोठी भूमिका पार पाडली आहे. या आॅपरेशनचे नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी अमिताभ यश हे आहेत. बुंदेलखंडमधील डाकूंचा अंत करण्यासाठी ज्यांचे नाव घेतले जाते, ते हेच अमिताभ यश. ते एसटीएफचे प्रमुख आहेत. त्यांचीच टीम विकासला उज्जैनहून कानपूरला आणत होती.अमर दुबेचे वडील ५ वर्षांनंतर जिवंतविकासचा सहकारी अमर दुबे याचे वडील संजीव दुबे हे एका पोलीस आॅपरेशनमध्ये जिवंत झाले. या कुटुंबाने काही वर्षांपूर्वीच सांगितले होते की, संजीव दुबे यांचे निधन झाले आहे. अमर दुबे याला पोलिसांनी बुधवारी हमीरपूर जिल्ह्यात ठार मारले. पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून संजीव बाहेर आला. एका अपघातानंतर तो अंडरग्राऊंड झाला होता.विकास दुबेवर होते ६२ गुन्हे दाखल, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर प्रकरणेनवी दिल्ली : कुख्यात गुंड विकास दुबे याचे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर केले. त्याच्यावर ६२ हून अधिक गुन्हे दाखल होते. राज्यमंत्री दर्जाच्या एका भाजप नेत्याच्या हत्येचा आरोप त्याच्यावर होता.विकास दुबे याने भाजप नेते संतोष शुक्ला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर विकासवर गुन्हाही दाखल झाला होता. त्याने सहा महिन्यांनंतर शरणागती पत्करली होती. चार वर्षांनंतर त्याची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.१९९९ मध्ये दुबे याने आपल्या गावात झुन्ना बाबा या व्यक्तीची हत्या केली होती आणि त्यांची जमीन आणि इतर संपत्ती हडप केली होती. २००० मध्ये त्याच्यावर एका निवृत्त प्राचार्यांच्या खुनाचाही आरोप ठेवला गेला. त्यासाठी तो तुरुंगातही गेला होता.संतोष शुक्ला हत्याकांडानंतर दुबेला राजकीय पाठबळ मिळू लागले. त्यानंतर विकास दुबेचे नाव केबल आॅपरेटर दिनेश दुबेच्या हत्येशी जोडले गेले. २० हजार रुपयांच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. दुबे हा जिल्हा परिषदेचा सदस्यही राहिलेला आहे. त्याच्या लहान भावाची शेजारच्या बिट्ठी गावातील सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी विकासच्या भावाची पत्नी जि.प. सदस्य होती. उत्तर प्रदेशात विकासविरुद्ध ६२ गुन्हे दाखल आहेत. यात हत्येची पाच, हत्येच्या प्रयत्नाची ८ प्रकरणे आहेत. १९९० मध्ये दुबेविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर दोन वर्षांनी एका दलित युवकाच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.
विकास दुबे एन्काऊंटरच्या पटकथेमागे कोण? विरोधकांनी मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 4:32 AM