लोकमत न्यूज नेटवर्कराजकोट : गुजरातमध्ये १ डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होईल. उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान आहे. पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर बड्या नेत्यांनीही जोरदार प्रचार केला.
लोकमतच्या चमूने या टप्प्यातील ८९ जागांचा दौरा केला. तेव्हा पाटीदार आंदोलनाचा प्रभाव संपल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाजपने पाटीदारांचे मन वळवले आहे. अशा स्थितीत काँग्रेसला गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करता येईल का? हे पाहावे लागेल.
हाय प्रोफाइल प्रचारभाजपकडून हायप्रोफाइल प्रचार करण्यात आला. मेळाव्याच्या ठिकाणी पक्षाने प्रचार साहित्याच्या वितरणासाठी स्टॉल्स लावण्यात येत होते. याशिवाय सभेच्या ठिकाणी मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
आपने लक्ष वेधून घेतलेयावेळी १८२ जागांसाठी तिरंगी लढत होत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतली आहे. बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७ निवडणुकीत भाजपला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. मध्य गुजरातेत भाजपला ३७, काँग्रेसला २२ जागा मिळाल्या. दोन जागा इतरांनी पटकावल्या होत्या.