सध्या संपूर्ण देशात 'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी 'एक देश, एक निवडणूक', अर्थात लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी एक 8 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. महत्वाचे म्हणजे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. यानंतर आता, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह I.N.D.I.A आघाडीतील अनेक घटक पक्ष याला विरोध करत आहेत.
यासंपूर्ण घडामोडीत सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी ऑल इंडिया सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये 4 हजार 182 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. यात, 'एक देश, एक निवडणूक' लागू झाल्यास, सर्वाधिक फायदा कुणाला होणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर धक्कादायक आकडे समोर आले आहेत. यात, सर्वाधिक 45 टक्के कोलांनी याचा फायदा सर्वच राजकीय पक्षांना होईल, असे म्हटले आहे.
याशिवाय, 20 टक्के लोकांनी एनडीए आणि 15 टक्के लोकांनी I.N.D.I.A आघाडीला याचा सर्वाधिक फायदा होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर याचा फायदा कुणालाही होणार नाही, असे 9 टक्के लोकांचे मत आहे. तसेच, 11 टक्के लोकांना सांगू शकत नाही, असे उत्तर दिले.
...तर I.N.D.I.A आघाडीत फूट पडेल? -सर्व्हेमध्ये एक प्रश्न असाही विचारण्यात आला होता की, 'एक देश, एक निवडणूक' लागू झाल्यास I.N.D.I.A आघाडीत फूट पडेल का? यावर उत्तर देताना तब्बल 29 टक्के लोकांनी उत्तर दिले 'हो'. 45 टक्के लोकांनी सांगितले 'नाही'. तर 26 टक्के लोकांनी सांगितले, यासंदर्भात काहीही सांगू शकत नाही.