नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टा घोटाळ्याच्या तपासाचा भाग म्हणून केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) आदित्य बिर्ला उद्योगसमूहाच्या कार्यालयांवर घातलेल्या धाडींमध्ये एका अधिकाऱ्याच्या संगणकीय नोंदींत गुजरातच्या ‘सीएम’ना २५ कोटी रुपये दिल्याची नोंद आढळली. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ५०० व हजारच्या नोटा रद्द करण्यावर राज्य विधानसभेत मंगळवारी टीका करतानाही, या संगणकीय नोंदीचा उल्लेख केला आणि ही नोंद त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना पैसे दिल्याची आहे, असा थेट आरोप केला. ही नोंद ज्या कालखंडातील आहे. त्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, असा त्यांचा तर्क होता. यावरून राजकीय वादळ उठले. भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत वर्मा यांनी या आरोपांचा इन्कार केला. यावरून केजरीवाल यांची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ व या निर्णयाने मोदींना मिळत असलेल्या प्रचंड समर्थनामुळे त्यांना आलेले नैराश्य स्पष्ट होते, असा प्रतिहल्ला त्यांनी केला. मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी रोखण्यासाठी याआधी हा आरोप करून काँग्रेस तोंडघशी पडली होती, असा दावाही त्यांनी केला.आदित्य बिर्ला समूहावरील धाडीत जी कागदपत्रे सापडली, त्यात त्यांचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह शुभेंदू अमिताभ यांच्या लॅपटॉपमध्ये त्यांनी ब्लॅकबेरीवरून पाठविलेल्या एका मेलचे बॅकअप मिळाले. त्यात गुजरात सीएमना २५ कोटी देण्यासंबंधीचा उल्लेख होता. १२ देऊन झाले, बाकीचे द्यायचे शिल्लक आहेत, असे संक्षिप्त स्वरूपात लिहिलेले होते. ही नोंद १६ नोव्हेंबर २०१२ या तारखेची होती. तपास अधिकाऱ्यांनी यासंबंधी विचारले असता, अमिताभ यांनी असे सांगितले होेते की, या नोंदी आपण व्यक्तिगत स्मरणासाठी केल्या होत्या आणि त्यात नावांचे संक्षिप्त स्वरूप लिहिताना कोणतेही ठरावीक सूत्र ठरलेले नव्हते. ‘गुजरात सीएम’ हा उल्लेख गुजरात सरकारच्या गुजरात अल्कली केमिकल्स या कंपनीच्या संदर्भात होता. अर्थात, या खुलाशाने समाधान न झाल्याचे तपास अधिकाऱ्याने वरिष्ठांना पाठविलेल्या अहवालात नमूद केले होते. याच शुभेंदू अमिताभ यांच्या दिल्लीतील कार्यालयावरील धाडीत २५ कोटी रुपयांची रोकडही सापडली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२५ कोटी दिल्याची नोंद असलेले गुजरातचे ते ‘सीएम’ नेमके कोण?
By admin | Published: November 17, 2016 2:39 AM