नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवापासून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. आता काँग्रेसच्या पुढील अध्यक्षांसंदर्भात एप्रिलमध्ये निर्णय होणार आहे.
सोनिया गांधी याच यापुढेही काँग्रेसच्या अध्यक्षा कायम राहणार की, त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाला संधी मिळणार हे एप्रिलमध्ये ठरणार आहे. काँग्रेस नेतृत्वासंदर्भातील निर्णय पक्षाच्या महाधिवेशनात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात राहुल यांनी काहीही निर्णय़ घेतला नसल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पक्षाला पूर्ववेळ अध्यक्षाची गरज आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षातील पूर्णवेळ अध्यक्षाची गरज अधोरेखित झाली आहे. ज्या काँग्रेसने दिल्लीत 15 वर्षे सत्ता मिळवली त्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा येथे खातंही उघडता आलेलं नाही. तर 66 पैकी 63 जागांवर काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.