हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?; हायकोर्टाची शेतकरी आंदोलनावर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:47 PM2024-03-07T12:47:36+5:302024-03-07T13:03:00+5:30
तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून त्यांना चेन्नईला पाठवायला हवे असं न्यायाधीश म्हणाले.
नवी दिल्ली - पंजाब आणि हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चंदीगड हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी आंदोलनाचे फोटो पाहून न्यायाधीश आंदोलक शेतकऱ्यांवर संतापले. हरियाणा सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो कोर्टाला दाखवले. कोर्टाने शुभकरणच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचसोबत हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे.
गुरुवारच्या सुनावणीत हायकोर्टाने पंजाब, हरियाणा सरकारसह शेतकऱ्यांनाही सुनावले. हे आंदोलन हाताळण्यास दोन्ही राज्याचे सरकार अपयशी ठरले. शेतकरी शुभकरण यांच्या मृत्यूची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले. याठिकाणी ३ सदस्यीय समिती बनेल. सुनावणीवेळी हरियाणा सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो हायकोर्टाला दाखवले तेव्हा न्यायाधीश संतप्त झाले.
आंदोलनाचे फोटो पाहून हायकोर्टानं म्हटलं की, ही खूप लाजिरवाणी बाब आहे, तुम्ही मुलांना पुढे करत आहात. मुलांच्या आडून आंदोलन करताय तेदेखील हातात शस्त्रे घेऊन, तुम्हाला इथं उभं राहण्याचाही अधिकार नाही. तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून त्यांना चेन्नईला पाठवायला हवे. तुम्ही निर्दोष लोकांना पुढे करताय हे लज्जास्पद आहे असं कठोर टिप्पणी कोर्टाने केली.
शुभकरणचा मृत्यू कसा झाला?
दरम्यान, शुभकरणच्या मृत्यूचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. पटियालाच्या खनौरी इथं शुभकरण सिंगचा मृत्यू झाला होता. शुभकरणचा मृत्यू एखाद्या शस्त्राने हाताला झालेल्या जखमेमुळे मृत्यू झाल्याचे पोस्टमोर्टममधून समोर आले आहे. शुभकरणच्या डोक्यात पातळ छर्रेही होते. गेल्या २० दिवसांपासून हरियाणा बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. हा मोर्चा दिल्लीच्या दिशेने जाणार आहे. मात्र आता हायकोर्टाने या आंदोलन शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
"आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते आणायचे ठरवा"
देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड आणि मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाठिंबा दिला आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. आता वेळ आली आहे की, शेतकऱ्यांनी काहीही न मागता, त्यांना देशात कोणाचे सरकार आणायचे आहे, हे ठरवावे, असं नाना पाटेकर म्हणाले.