ऑनलाइन टीम
रायपूर, दि. ७ - बलात्कार कोणी मुद्दाम करत नाही, तो होऊन जातो, अशी मुक्ताफळे छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांनी उधळली आहेत. बलात्कारासारख्या संवेदनशील विषयांबाबत बोलताना अनेक राजकीय नेत्यांची जीभ घसरण्याचा प्रकार अद्याप सुरूच आहे हे यावरून स्पष्ट होते.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना पैकरा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ 'लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शारिरीक संबंध व त्यानंतर लग्न न करणे या अर्थाने केलेली फसवणूक' असा होतो की त्याचा दुसरा काही अर्थ निघतो हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वीही अनेक नेत्यांनी अशी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत. यापूर्वी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नेते बाबू लाल गौर यांनी 'काही बलात्कार योग्य असतात, तर काही अयोग्य' असे विधान केले होते. उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे अखिलेश यादव यांच्या सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती. त्या पार्श्वभूमीवर गौर यांनी अखिलेश यांचा बचाव करताना हे विधान केले होते. कोणी सांगून, पूर्वसूचना देऊन तर बलात्कार करायला जात नाही, असे सांगत गौर यांनी या वाढत्या घटनांमध्ये अखिलेश यांच्या सरकारची चूक नसल्याचे म्हटले होते.
गौर यांच्या विधानानंतर पैकरा यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहे.