नवी दिल्ली - 2019 साली होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये शह आणि काटशहाचे खेळही सुरू झाले आहेत. एकीकडे मोदींविरोधात विरोधकांची एकजूट उभी राहत असतानाच एनडीएमधील घटक पक्षांना सोबत ठेवण्याचा आव्हान भाजपासमोर आहे. त्यातच भाजपाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या बिहारमध्ये 2019 च्या निवडणुकीत एनडीएचा चेहरा कोण असेल यावरून घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे भाजापचे मित्रपक्ष आपली उपयुक्तता सिद्ध करून आघाडीमध्ये अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. गुरुवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीपूर्वीच जेडीयूने बिहारमध्ये नितीश कुमार हेच एनडीएचा चेहरा असतील अशी केलेली घोषणा ही त्याचाच एक भाग आहे. आता 2014 साली मोदींचा चेहरा पुढे करून बिहारमध्ये निवडणुकीस सामोरी जाणारी भाजपा जेडीयूच्या या प्रस्तावाला स्वीकारणार का हा सवालच आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएमधील अजून एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार नव्हे तर नरेंद्र मोदीच एनडीएचा चेहरा असतील, असे स्पष्ट केले आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या या भूमिकेमुळे बिहारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांमध्येच आघाडीवरून खडाखडी होण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभेच्या 40 जागा असलेल्या बिहारमध्ये जेडीयूला एनडीएत मोठ्या भावाचे स्थान हवे आहे. तसेच त्यांनी त्या दृष्टीने दावेदारी करून भाजपाला आपले म्हणणे मान्य करण्यास भाग पाडण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी 2019 साली बिहारमध्ये नरेद्र मोदीच चेहरा असतील, असे सांगून तिढा वाढवला आहे.
बिहारमध्ये एनडीएचा चेहरा कोण? घटक पक्षांमध्ये सुरू झाली धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 7:03 PM