अहमदाबाद - मंदिरात हिंदू आले काय आणि अहिंदू काय...भाजपाला काय समस्या आहे अशी विचारणा स्वामी नारायण मंदिराच्या पुजा-याने केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरात जाण्यावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना त्यांनी राहुल गांधींचा बचाव केला आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ बोलताना पुजा-याने सांगितलं की, 'राहुल गांधी जरी मंदिरात आले असेल तरी त्यांनी स्वत: रजिस्टरमध्ये अहिंदू म्हणून नोंद केलेली नाही. त्यावर राहुल गांधींची स्वाक्षरी नाहीये'. याचवेळी त्यांनी भाजपाला एखाद्याचा धर्म विचारायचा अधिकार कोणी दिला ? अशी विचारणाही त्यांनी केली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या सोमनाथ मंदिरात अहिंदू (Non-Hindu) म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विरोधक राहुल गांधींना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते विरोधकांना चोख उत्तर देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत की, माझी आजी आणि संपुर्ण कुटुंब शिवभक्त आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतानाही दिसत आहेत.
'आम्ही काही गोष्टींना खासगी ठेवण्यावर विश्वास ठेवतो. यासंबंधी आम्ही बोलत नाही. कारण आम्हाला वाटतं की, जो आमचा धर्म आहे तो आमची खासगी गोष्ट आहे, तो आमच्या आत आहे. यासाठी आम्हाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ही जी आमची गोष्ट आहे त्याचा आम्हाला ना व्यापार करायचा आहे, ना आमची दलाली करण्याची इच्छा आहे', असं राहुल गांधी व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. राहुल गांधींचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचीही नोंद अहिंदू म्हणून करण्यात आली होती. मंदिराच्या सुरक्षा रजिस्टरमध्ये ही नोंद काँग्रेसचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी केली होती. मंदिराच्या नियमानुसार, अहिंदूंना रजिस्टरमध्ये नोंद करणे अनिवार्य आहे. मात्र रजिस्टरवर राहुल गांधींची सही नाहीये. राहुल गांधी यांच्यासोबत अहमद पटेल यांच्याशिवाय राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतदेखील उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी बुधवारी 29 नोव्हेंबरला गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. गेल्या तीन महिन्यात 19 वेळा राहुल गांधींनी मंदिराला भेट दिली आहे. यावरुनच पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव घेतना सोमनाथ मंदिरात तुमच्या पुर्वजांनी बनवलेलं नाही अशी टीका मोदींनी केली होती. नरेंद्र मोदी बोलले होते की, 'आज सोमनाथ संपुर्ण जगभरात प्रसिद्द आहे. आज ज्या लोकांना सोमनाथ मंदिराची आठवण येत आहे, त्यांना इतिहास माहित आहे का विचारा'.