नवी दिल्ली : हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला. भारतावर अणुहल्ल्याची धमकी सलाउद्दिन याने दिली असून, त्यासंदर्भात नायडू यांनी बोलत होते. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, कोण हा सलाउद्दिन? काश्मीरवर बोलण्याचा अधिकार त्याला कोणी दिला आहे? धमकीने काहीही होणार नाही. तथापि, सलाउद्दिन आणि २६/११ हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाही नायडू यांनी यावेळी फटकारले. सलाउद्दिनचे वक्तव्य म्हणजे प्रसिद्धीचा खटाटोप आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्ताननेही यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला समर्थन देण्यासाठी पाकिस्तान नैतिक, राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या बांधील आहे. जर या लढ्याला पाकिस्तानने समर्थन दिले, तर दोन देशांतील अणुयुद्ध अटळ आहे, असे वक्तव्य सलाउद्दिन याने कराचीत सोमवारी केले. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरमधील हिंसाचाराकडे लक्ष दिले नाही, तर तेथील लोकच हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवतील. प्रसंगी नियंत्रण रेषेचेही उल्लंघन करावे लागेल, असेही सलाउद्दिन म्हणाला. पाकिस्तानातील अतिरेकी वा राजकीय नेत्याकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर विशेषत: काश्मीरवर दीर्घ काळानंतर अशा प्रकारचे भाष्य झाले आहे. काश्मिरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वणी हा ८ जुलै रोजी मारला गेल्यापासून तिथे मोठा हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत ६० जण मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही बुरहाण वणीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. शरीफ यांनी त्याचे जर्णन ‘शहीद’म्हणूनही केले होते.
सलाउद्दिनला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?
By admin | Published: August 09, 2016 3:19 AM