नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्र (ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन) स्थापन करण्यासाठी भारत सरकारसोबत करार केला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, भारताचे पारंपारिक औषध आणि उत्तम आरोग्याच्या पद्धती जगभरात खूप लोकप्रिय आहेत. तसेच, डब्ल्यूएचओ केंद्र आपल्या समाजात निरोगी राहण्यासाठी मदत करेल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
स्वित्झर्लंड येथील जिनिव्हामध्ये भारत सरकार आणि डब्ल्यूएचओ यांच्यात ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या स्थापनेशी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 13 नोव्हेंबर 2020 रोजी 5 व्या आयुर्वेद दिनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी ही घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतामध्ये पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली.
डब्ल्यूएचओने सांगितले की पारंपारिक औषधांच्या जागतिक ज्ञानाच्या या केंद्रासाठी भारत सरकारने 250 मिलियन डॉलरची मदत केली आहे. पृथ्वी आणि लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील पारंपारिक औषधांच्या क्षमतेचा उपयोग करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या जगातील जवळपास 80 टक्के लोक पारंपारिक औषधे वापरतात. आतापर्यंत 194 पैकी 170 डब्ल्यूएचओ सदस्य देशांनी पारंपारिक औषधांचा वापर केल्याचे नोंदवले आहे. या देशांच्या सरकारांनी पारंपारिक औषध पद्धती आणि उत्पादनांवरील विश्वसनीय पुरावे आणि डेटा तयार करण्यासाठी डब्ल्यूएचओचे समर्थन मागितले आहे.
आज वापरात असलेली जवळपास 40 टक्के औषधी उत्पादने नैसर्गिक पदार्थांपासून बनवली जातात, जी जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. उदाहरणार्थ, एस्पिरिनचा शोध विलोच्या झाडाची साल वापरून पारंपारिक औषध पद्धतींवर आधारित आहे.
याचबरोबर, गर्भनिरोधक गोळी जंगली Yam वनस्पतींच्या मुळांपासून तयार करण्यात आली असून लहान मुलांमधील कर्करोगावरील उपचार Rosy Periwinkle च्या फुलावर आधारित आहे. मलेरियाच्या उपचारासाठी आर्टिमिसिनिन या नोबेल पारितोषिक विजेत्याने प्राचीन चिनी वैद्यकीय ग्रंथांचे पुनरावलोकन करून संशोधन सुरू केले होते.