अहमदाबाद / शिमला : देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि गुजरातमुळे काहीशा झाकोळलेल्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपाला टक्कर दिली आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
182 जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी 68.41 टक्के मतदान झाले आहे. 68 जागांसाठी हिमाचल प्रदेशात 75 टक्के मतदान झाले आहे. गुजरातच्या 33 जिल्ह्यांतील 37 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये 42 केंद्रांवर मतमोजणी होत असून, सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानापूर्वी आलेल्या सर्वच एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता बनेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि गुजरात निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं त्रिकूट म्हणजे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी भाजपाच्या पराभवाचा दावा केला आहे. केवळ इव्हीएममध्ये घोळ करूनच भाजपा गुजरातमध्ये विजय मिळवू शकेल आणि 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करेल असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. अहमदाबादस्थित एका कंपनीचे 150 अभियंते मतदान यंत्रांत फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहेत, पाच हजार मतदानयंत्रांत फेरफार करण्याचा कट आहे. देवाने तयार केलेल्या मानवी शरीरात बदल करता येतात तर मग मानवानेच तयार केलेल्या मतदानयंत्रात का बदल करता येणार नाहीत, असा आरोप हार्दिक पटेल याने केला आहे. दुसरीकडे भाजपाचेच पुण्यातील सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गुजरातमध्ये भाजप सत्तेपासून दूर राहिल, असं संजय काकडे म्हणाले आहेत.
मात्र,मुंबईत नरिमन पॉईंट भागात जल्लोषाची तयारी भाजपाने केल्याचे दिसून येत आहे. भाजपा मुख्यालयाच्या कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आले आहे. ज्यावर जल्लोष असे लिहिण्यात आले असून ‘गुजरात-हिमाचल भाजपा की जीत’ असा मजकूरही छापण्यात आला आहे. बॅनरच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत.
या सर्व घडामोडींमुळे गुजरातच्या सत्तेचा ताज कोणाला मिळणार व एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.