हरीश गुप्ता नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवाराची निवड करताना भाजपला कसरत करावी लागत असून, ‘एक अनार - सौ बिमार’ ही म्हण त्यांच्यासाठी खरी ठरत आहे. प. बंगाल विधानसभेतील २९४ पैकी भाजपचे ७० आमदार आहेत. त्यांचे ५ आमदार तृणमूलमध्ये गेले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ४३ मतांची आवश्यकता आहे.
या जागेसाठी भाजपकडून जी सहा नावे समोर आली आहेत, त्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली, तत्कालीन कूचबिहार राजघराण्याचे अनंतराय महाराज, चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती, लेखक अनिर्बन गांगुली, भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य आणि राज्यसभेवर नियुक्त सदस्य स्वपनदास गुप्ता यांचा समावेश आहे. सौरव गांगुली आणि मिथुन चक्रवर्ती या सेलेब्रिटीला राज्यसभेवर पाठवून पक्षाची लोकप्रियता वाढविण्याचाही प्रयत्न आहे.
पंचायत निवडणुकीत तृणमूलचे वर्चस्वकोलकाता : प. बंगालमध्ये तृणमूलने आपले वर्चस्व सिद्ध करत घोषित केलेल्या २३,३४४ जागांपैकी १६,३३० जागांवर विजय मिळविला आहे, तर ३००२ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. प्रतिस्पर्धी भाजपने ३,७९० जागांवर विजय मिळविला आहे. तसेच, ८०२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींच्या ६३,२२९ जागांसाठी मतदान झाले होते.