आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याला कट्टरतावादी डावी विचारसरणी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरमा म्हणाले, जगभरातील उजव्या विचारसरणीचे नेते आता कट्टरतावादी डाव्यांच्या निशाण्यावर आहेत. एवढेच नाही तर, 'देश प्रथम' या विचारधारेचा पराभव केला जाऊ शकत नाही, असे म्हणत हिमंता यांनी माजी राष्ट्रपती लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठीही प्रार्थना केली आहे.
हिमंता बिस्वा सरमा एक्सवर एक पोस्ट करत म्हणाले, "शारीरिक अथवा इतर प्रकारे, जगभरातील उजव्या विचारसरणीचे नेते आता कट्टरतावादी डाव्यांच्या निशाण्यावर आहेत. मात्र हे हल्ले, 'राष्ट्र प्रथम' या विचारधारेचा पराभव करू शकणार नाहीत. ती खोल अध्यात्मात रुजलेली आहे आणि 'जननी जन्मभूमि च, स्वर्गादपि गरीयसी' या सनातन तत्वज्ञानाने प्रेरित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना माझ्या शुभेच्छा."
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला. हल्ला होताच यूएस सीक्रेट सर्व्हीस एजन्ट्स सावध झाले आणि त्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच प्रत्युत्तरात कारवाई करत हल्लेखोरालाही जागीच ठार केले. या हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स (Thomas Matthew Crooks) असे होते. तो २० वर्षांचा होता.
व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून चालवली होती गोळी -डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.